क्रीडा व मनोरंजन

उदयोन्मुख खेळाडूंच्या भविष्यासाठी ठाणे जिल्ह्यात पायाभूत सुविधा उभारणार – अजिंक्य नाईक

ठाणे, दि. २१  – आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडत आहेत. उदयोन्मुख खेळाडूंच्या भविष्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात  अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी दिली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ठाण्यातील सभासद मतदारांशी अजिंक्य नाईक यांनी  संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील ग्वाही दिली.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार क्षितीज ठाकूर, माजी नगरसेवक विकास रेपाळे,  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील, कार्यकारणी सदस्य नीलेश भोसले, अभय हडप आदी मान्यवर उपस्थित होते.

14 वर्षांखालील संघ असू दे किंवा रणजी ट्रॉफी असू दे मुंबईच्या संघात खेळण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू येत आहेत. भारतासाठी खेळत असलेला तुषार देशपांडे सुध्दा ठाणे  जिल्ह्यातून येतो. ठाणे  जिल्ह्यात  चांगल्या पायाभूत सुविधा कशा देता येतील, जास्तीत जास्त स्पर्धा कशा भरवता येतील यावर आमचा भर असल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

मढवी ट्रॉफी, १४ – १६ वर्षांखालील विविध स्पर्धा ठाणे  जिल्ह्यात  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होत आहेत. रणजीपटू ठाणेकर तुकाराम सुर्वे यांच्या नावाने यावर्षी पासून ठाण्यात स्पर्धा भरविणार असल्याची माहिती अजिंक्य नाईक यांनी दिली.

ठाणे  जिल्ह्यातील शहर असेल वा ग्रामिण भाग असेल या भागात अनेक स्पर्धा आम्ही सुरु करत आहोत. मैदानी क्रिकेट मुंबई क्रिकेटचा पाया आहे. मैदानी क्रिकेट जर चांगले करता आले तरच ठाणे जिल्ह्यातुन चांगले क्रिकेटर तयार होतील. खेळाडूंना आत्मनिर्भर करण्यासाठी जे बीसीसीआय मानधन देत आहेत तेच मानधन मुंबई क्रिकेट असोसिएशन देत असल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले.

खेळाडूला सक्षम करणे, त्यांना नोकरी उपलब्ध करुन देणे यावर आमचा भर आहे. शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये नोकरीसाठी आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. गेल्या 20 महिन्यात 40 ते 50  जणांना आम्ही निमशासकीय सेवेमध्ये नोकरी लावली आहे. मा. शरद पवार, मा. मनोहर जोशी, मा. विलासराव देशमुख या माजी अध्यक्षांनी शासन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये समन्वयाचा  चांगला  पूल उभारला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही पुढेही आम्ही चांगले काम करु असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??