राज्यस्तरीय ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’ साठी साहित्य पाठवा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने साहित्य पाठविण्याचे आवाहन
ठाणे – साहित्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या राज्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘साहित्यवलय पुरस्कार २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी रुपये १ लाखाहून अधिक रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
२७ फेब्रुवारी २०२४ मराठी भाषा गौरव दिवस ते २७ फेब्रुवारी २०२५ मराठी भाषा गौरव दिवस या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, ललित लेखन, विनोदी साहित्य, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, वृत्तबद्ध काव्य साहित्य, स्त्रीवादी साहित्य, गजल साहित्य, ऐतिहासिक साहित्य, लक्षवेधी साहित्य या पुरस्कारांसाठी मागवण्यात येत आहे. ‘साहित्यवलय’ या पुरस्काराचे स्वरुप ५ हजार ५५५ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. तर लक्षवेधी साहित्यासाठी १ हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली.
साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी कथा, कविता, कादंबरी या साहित्यकृतींपैकी उत्कृष्ट साहित्यकृतीला पुरस्कृत करण्यात येईल. पुरस्कार सोहळा ठाण्यात होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने साहित्य क्षेत्रातील नवोदित लेखकांच्या पहिल्या पुस्तकासाठी साहित्यवलय साहित्य पदार्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक साहित्यिकांना वेगवेगळ्या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून ठराविक उत्कृष्ट पुस्तकांना ‘साहित्यवलय लक्षवेधी साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. याचबरोबर साहित्यवलय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, साहित्यवलय उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार, साहित्यवलय उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, साहित्यवलय
उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार, साहित्यवलय विनोदी साहित्य पुरस्कार, साहित्यवलय बालसाहित्य पुरस्कार, साहित्यवलय अनुवादित साहित्य पुरस्कार, साहित्यवलय वृत्तबद्ध काव्य साहित्य पुरस्कार, साहित्यवलय स्त्रीवादी साहित्य पुरस्कार, साहित्यवलय गजल साहित्य पुरस्कार, साहित्यवलय ऐतिहासिक साहित्य पुरस्कार अशा विभागात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अधिकाधिक साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृती पाठवाव्यात असे आवाहन धृपद एन्टरटेंन्मेंट चे ऋग्वेद देशपांडे यांनी केले.
इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती, अल्प परिचय आणि पासपोर्ट फोटोसह मनसे कार्यालय, इमारत क्र. ४२ समोर, साईबाबा मंदिर जवळ, वर्तक नगर, ठाणे (प.) – ४००६०६ या पत्यावर १ ऑगस्ट २०२५ पर्यंत पाठवावा तसेच अधिक माहितीसाठी 9819626060 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संदीप पाचंगे यांनी केले आहे.



