आपला जिल्हा

माझगाव डॉकचे चेअरमन कॅप्टन श्री. जगमोहन यांची खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली भेट

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर युनियन अध्यक्षपद म्हणून खासदार नरेश म्हस्के यांची कॅप्टन श्री. जगमोहन यांच्याशी चर्चा

मुंबई – माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्यानंतर बुधवार, १६ जुलै रोजी त्यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डारेक्टर कॅप्टन श्री. जगमोहन यांची भेट घेतली. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर यावेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. श्री. जगमोहन यांनी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन खासदार नरेश म्हस्के यांना दिले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या सागरी सुरक्षेचा मजबूत किल्ला असलेली माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी आजही देशाच्या संरक्षणात आपलं अमूल्य योगदान देत आहे. मुंबईच्या हृदयात वसलेली ही ऐतिहासिक शिपबिल्डिंग कंपनी भारतातील एकमेव अशी संस्था आहे जिथे आधुनिक युद्धनौका, फ्रिगेट्स आणि पाणबुडींसारख्या महत्त्वाच्या संरक्षण साधनांची निर्मिती केली जाते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या कंपनीचा ताबा घेतला आणि आता ती संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली आहे. त्यानंतर देशासाठी अत्याधुनिक युद्धनौकांची निर्मिती करणारी ही कंपनी म्हणून माझगाव डॉकचे नाव देशभरात आदराने घेतलं जातं. पण, देशाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या या कंपनीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांच्या समस्या मात्र अद्यापही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. पर्मनंट आणि कॉन्ट्रॅक्ट कामगारांमधील असमतोल, पेन्शन आणि वैद्यकीय योजना यातील त्रुटी, तसेच कामाच्या स्थैर्याची कमतरता या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर माझगाव डॉक कामगार युनियनचे अध्यक्ष खासदार नरेश म्हस्के यांनी माझगाव डॉकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डारेक्टर कॅप्टन श्री. जगमोहन (रिटायर्ड नेव्ही ) यांची भेट घेतली.

भेटीदरम्यान माझगाव डॉकच्या वरिष्ठ अधिकारी अरुण कुमार चांद यांच्यासह अनेक अनुभवी कामगारांशी खासदार नरेश म्हस्के यांनी  चर्चा केली. कामगारांच्या अनेक समस्यांवर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. वर्कर्सना पर्मनंट करण्याचा विषय, वैद्यकीय सेवा, पेन्शन योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अनेक जुने प्रलंबित विषय देखील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी प्रशासनाने काही मागण्या तात्काळ मान्य केल्या आणि उर्वरित विषयांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन देखील दिले. या चर्चेमध्ये कामगारांच्या प्रतिनिधींसह डॉकचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी कामगारांना स्पष्ट शब्दांत सांगितले की , “तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे, तो कधीही खोटा ठरू देणार नाही. तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन आणि यासाठी पाठपुरावा करेन.”

या भेटीदरम्यान माझगाव डॉकच्या जहाज बांधणी प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक विभागांनाही खासदार नरेश म्हस्के यांनी   भेट दिली. आजपर्यंत तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक युद्धनौकांचे कामकाज जवळून पाहिले. यावेळी माझगाव डॉकच्या प्रशासनाने खासदार नरेश म्हस्के यांचा सन्मान केला.

संरक्षण मंत्रालयाकडे माझगाव डॉकसाठी अधिकाधिक नवीन काम मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. खासगी क्षेत्रात ज्या निविदा काढल्या जात आहेत, त्या थांबवून सरकारी कंपनीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी आश्वासन दिले.

यावेळी युनियन कमिटीचे सरचिटणीस सुशांत राऊत, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर चव्हाण व मयूर डेरे, खजिनदार किरण जाधव आणि संघटक सिद्धार्थ घोडके हे उपस्थित होते. व्यवस्थापनाच्या वतीने कार्यकारी संचालक अरुणकुमार चांद, महाव्यवस्थापक श्रीनिवास सिन्हा आणि अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यनारायण प्रधान उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??