ताज्या घडामोडी

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरूस्तीची कामे सर्व प्राधिकरणाने युद्धपातळीवर पूर्ण करावीत – आयुक्त सौरभ राव

ठाणे (27) : ठाणे शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरूस्तीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी केली. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे स्वच्छ करुन ते मास्टिकच्या सहाय्याने युदृधपातळीवर दुरूस्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी महापालिका, मेट्रो प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए या सर्व प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांना दिले.

          या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड, एमएमआरडीए मेट्रोचे कोऑर्डिनेटर जयवंत ढाणे, कार्यकारी अभियंता श्री. शेवाळे, श्री. महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी सुनील पाटील शाखा अभियंता श्री. परदेशी  तसेच ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम, प्रकाश खडतरे, श्री जवळकर आदी उपस्थित होते.

            ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे रस्तयांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ते तातडीने दुरूस्त करण्याची कार्यवाही करत असतानाच रस्तयावर उंचवटा राहणार नाही. रस्त्यांवरील खड्डे भरल्यानंतर सदर ठिकाणचा रस्ता हा एकसमान राहिल अशा पध्दतीने रस्त्याची दुरूस्ती करावी. तसेच रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली पावसाळी गटारांची साफसफाई करण्यात यावी. तसेच गटारातील काढण्यात आलेला गाळ हा तेथेच न टाकता तो तातडीने उचलण्यात यावा अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

            ठाणे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या जंक्शनवर ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत त्या ठिकाणी पॅचवर्क करुन रस्ता सुस्थितीत होईल अशा पध्दतीने काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. माजिवडा जंक्शन ते नागला बंदर रस्त्यांची पाहणी देखील यावेळी करण्यात आली. रस्त्यावरील खड्डयामुळे वाहतूक कोंडी होत असून ती सोडविण्याच्या दृष्टीने रस्त्याची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. एखादा छोटा खड्डा असेल तर तो मोठा होण्याआधीच तो भरण्यात यावा. घोडबंदर रोडवर सद्यस्थितीत मेट्रोचे काम सुरु नसून मेट्रोच्या कामाचे जे साहित्य रस्त्यावर ठेवण्यात आले आहे, त्याचा अडथळा वाहनचालकांना होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??