ताज्या घडामोडी

ठाणे–आदमापूर एस.टी. बस सेवेचा शुभारंभ; बाळूमामांच्या जयघोषात प्रारंभ

महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री . प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून ठाणे ते आदमापूर (गारगोटी आगार) या मार्गावर थेट एस.टी. बस सेवा सुरू करण्यात आली. वंदना एस.टी. डेपो, ठाणे येथून आज सकाळी ८.०० वाजता या बस सेवेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला.
सदर बसचे पूजन नगरसेविका  शितल संतोष ढमाले व विभाग प्रमुख संतोष ढमाले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी “श्री बाळूमामा की जय” च्या जयघोषात बस मार्गस्थ करण्यात आली. चालक व वाहक यांचा सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमास धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व पत्रकार दीपक कुरकुंडे, शिवस्वरूपाय बाळूमामा देवस्थानाचे पुजारी नरेश शिरगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ठाणे जिल्हा सरचिटणीस व महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्ट सहसचिव संजय पांडुरंग कांबळे,अजय कांबळे, शिवसेना विभाग समन्वयक राजेंद्र तानाजी कांबळे व शाखाप्रमुख  किरण भगवान भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
गारगोटी आगार (कोल्हापूर विभाग) तर्फे सुरू करण्यात आलेली ही बस सेवा गारगोटी–मुरगुड–आदमापूर–बिद्री–शेळेवाडी–कोल्हापूर–कराड–सातारा–मेगा हायवे–खारघर–पनवेल–वाशी–एरोली मार्गे ठाण्यापर्यंत धावणार आहे.वेळापत्रकानुसार, गारगोटीहून सकाळी ८.०० वाजता, मुरगुडहून सकाळी ८.४० वाजता तर ठाणे (वंदना एस.टी. स्थानक) येथून सकाळी ८.०० वाजता बस सुटते.
ही बस ‘लालपरी’ साध्या दरात 2×2 पुशबॅक सुविधेसह उपलब्ध असून, ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास (अटी लागू) तसेच महिला प्रवासी सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५०% सवलत देण्यात येत आहे.
यापूर्वी ठाणेहून आदमापूरला जाण्यासाठी प्रवाशांना कोल्हापूर येथे उतरून दुसरी बस पकडावी लागत होती. मात्र आता थेट सेवा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित व किफायतशीर झाला आहे. ठाणे व मुलुंड परिसरात कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, या सेवेचा विशेष लाभ श्री बाळूमामा भक्तांना होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??