ताज्या घडामोडी

ठाणे खोपट एसटी आगारात सुविधांमध्ये वाढ; यंदा तिसऱ्या क्रमांकाची आशा

ठाणे येथील खोपट एसटी आगाराने प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करत आपली गुणवत्ता उंचावली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून वर्षातून 4 वेळा सर्वेक्षण करण्यात येते. यापूर्वी झालेल्या तीन सर्वेक्षणांमध्ये आगाराला मुंबई विभागात सरासरी ८३ गुण मिळाले असून चौथा क्रमांक मिळाला होता. मात्र चौथ्या सर्वेक्षणात या वर्षी तिसरा क्रमांक मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
आगार परिसरात एसटी गाड्यांचा इतिहास दर्शविणारे बॅनर प्रत्येक फलाटावर लावण्यात आले आहेत. तसेच लोकसहभागातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला असून, “फक्त झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे” यावर विशेष भर देण्यात येत आहे. वाढदिवसानिमित्त एक झाड लावण्याचा उपक्रम राबवून सुंदर बाग तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.प्रवाशांसाठी वेळापत्रक, स्वच्छ व सुलभ शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रवासी वाचनालय, महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’, विविध सवलत योजनांचे माहिती फलक,वेळापत्रक तसेच प्रत्येक फलाटावर गाड्यांची नावे असलेले फलक अशा विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक शुक्रवारी स्थानकात स्वच्छता मोहीम राबवली जाते.
 
तसेच एसटी कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृहात गरम पाणी व एसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, एसटी व इतर माहितीसाठी उद्घोषणाही सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधा विभाग नियंत्रक सागर पडसुळे आणि यंत्र अभियंता विवेक लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आल्या आहेत.
 
दरम्यान, संभाजीनगर येथील विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल, कामगार अधिकारी घोडके तसेच वाहतूक अधीक्षक स्वाती घोडे यांनी नुकतेच आगाराचे चौथे सर्वेक्षण करून या उपक्रमांचे कौतुक केले आहे. त्यामुळे यंदा खोपट आगाराला पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळेल, असा विश्वास आगार व्यवस्थापक राहुल बोरसे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??