आपला जिल्हा

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवरील अवजड वाहनांचा ताण झाला कमी

वाहतुकीला अधिक शिस्त लावण्यासाठी आणखी उपाय करण्याचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश

ठाणे (०७) : भिवंडी-नाशिक बायपास रस्त्यावरून घोडबंदर रोडवर जाणाऱ्या अवजड वाहनांना कॅडबरी जंक्शनच्या पुलाखालून उजवे वळण (यू टर्न) देण्यात आले आहे. या बदलामुळे माजिवडा जंक्शनवरील अवजड वाहनांचा ताण कमी झाला आहे.

भिवंडी बायपासावरून ठाण्याकडे येणाऱ्या अवजड आणि लहान वाहनांचे माजिवडा पुलापूर्वी वर्गीकरण करण्यात आले आहे. हाइट बॅरीअर लावल्याने अवजड वाहने पुलावरून कॅडबरी जंक्शन पुलाखाली येतात. तिथे सिग्नल पूर्वी देण्यात आलेल्या उजव्या वळणाचा वापर करून अवजड वाहने घोडबंदर रोडकडे मार्गस्थ होऊ लागली आहेत. त्यामुळे, माजिवडा जंक्शन खाली होणारी अवजड वाहनांची कोंडी दूर झाली आहे.

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन येथे करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचा आढावा शुक्रवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ. विनयकुमार राठोड यांनी संयुक्त पाहणी दौऱ्यात घेतला.

जेएनपीटी, पुणे, नाशिक येथून ठाणे मार्गे होणारी माल वाहतूक मुंब्रा बायपास आणि घोडबंदर रोडवरून मुंबई किंवा अहमदाबादच्या दिशेला जाण्यासाठी कापूरबावडी जंक्शन मधून जाते. शहरांतर्गत असलेल्या हे दोन्ही जंक्शन्स प्रचंड वर्दळीचे आणि गुंतागुंतीचे झाले होते. यावर पर्याय म्हणून माजिवडा पूलावरून कॅडबरी चौकाआधी या वाहनांना यू टर्न देण्यात आला. त्यामुळे ही अवजड वाहने आता कॅडबरीचा यू टर्न वापरून कापूरबावडीच्या दिशेने पुलावरून जाऊ लागली आहेत. त्यासाठी माजिवडा जंक्शन पूर्वी हाईट बॅरिअर लावण्यात आले. त्यावर ब्लिंकर्स, त्याआधी रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले.

या माध्यमातून वाहतूक वळवून आता एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पुलाखालील वाहतूक सुरळीत झाली आहे. या बदलांमुळे माजिवडा आणि कापूरबावडी जंक्शन पुलाखालील वाहतूक पूर्णत: अवजड वाहनमुक्त करण्यात यश मिळाले आहे.

आजच्या पाहणी दौऱ्यात, हाइट बॅरिअर सुरू होण्यापूर्वी रस्त्यावर रम्बलर लावावेत. तसेच, हाईट बॅरिअरला रिफ्लेक्टर रेडिअम बसवावेत, म्हणजे रात्रीच्या वेळीही दोन्ही प्रकारच्या वाहन चालकांना मार्गिका बदल आणि  हाइट बॅरीअर यांची आगावू सूचना मिळेल, असे निर्देश श्री. बांगर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

चक्राकार वाहतूक

कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन वरील वाहतुकीचे परिचलन नीट व्हावे यासाठी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस विविध उपाय करीत आहेत. ही दोन्ही जंक्शन्स वर्दळीच्या जंक्शन्सपैकी आहेत. येथे गाड्यांची वाहतूक वेगवेगळ्या विविध दिशांना होते. तर, अनेक मार्गिका एकमेकांना छेदणाऱ्या (क्रिस क्रॉस पद्धतीच्या) आहेत. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होतो. यामुळे या दोन्ही जंक्शन्सवर चक्राकार पद्धतीने (रोटरी) वाहतूक नियोजन करून एकमेकांना छेदणारी वाहतूक (क्रिस क्रॉस मुव्हमेंट) शक्य तेवढी कमी करण्याचा प्रयत्न महापालिका आणि वाहतूक पोलीस करत आहेत.

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून माजिवडा आणि कापूरबावडी जंक्शन या ठिकाणी वाहतूक मार्गिका निश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहतूक बेट विकसित करून त्याची अमलबजावणी करण्याची सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिली. याची अमलबजावणी झाल्यावर, पुलाखाली जंक्शनवर झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग, ग्रिड मार्किंग करून घेण्यासही त्यांनी सांगितले.

अधिकृत पार्किंग

कापूरबावडी नाका, माजिवडा नाका येथील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागांवर असमाजिक तत्त्वांचा वावर असतो. गर्दुल्ले असतात. अनधिकृत पार्किंग केले जाते. याला आळा बसण्यासाठी मळक्या, अस्वच्छ जागा साफ करून तेथे नियंत्रित अधिकृत पार्किंग केले जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

या पाहणी दरम्यान, उथळसर येथील रस्ते दुभाजकांच्या माध्यमातून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समांतर पार्किंग होत असल्याचे निर्दशनास आले. तसेच, फुटपाथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणे, व्यवसायधारक-फेरीवाले यांच्यावरही नियंत्रण आल्याचे दिसले.

के व्हीला येथे नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या पुलाची पाहणी आयुक्त श्री. बांगर यांनी केली. राबोडी ते साकेत येथील उड्डाणपुलाच्या कामाची माहितीही त्यांनी घेतली. के व्हीला पुलाखालील ब्रिटिशकालीन कमान (आर्च) पद्धतीचे गाळे पाडून नवीन बॉक्स पद्धतीचे गाळे करण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कोणत्याही अवरोधाशिवाय वाहणे शक्य झाले आहे. यामुळे के व्हीला, उथळसर या रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. पुलाच्या एका बाजूला राहिलेले दोन मीटरचे काम पावसाळ्यानंतर त्वरित करण्याची सूचना यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी दिली.

के व्हीला पुलाखालील दुभाजकामुळे नाल्या शेजारील भागीरथी जगन्नाथ गृहनिर्माण सोसायटीमध्ये पावसाचे पाणी साठू लागण्याची बाब स्थानिक नागरिकांनी आयुक्त श्री. बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली. या सखल भागात पंप लावून पावसाचे पाणी हटवण्याचे काम करावे. तसेच, पावसाळ्यानंतर येथे कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.

एलबीएस मार्गावर रहेजा सोसायटी परिसरातील रस्त्यात कामांची पाहणी करण्यात आली. तसेच, अपलॅब चौकात रस्त्याचे काँक्रीटीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. तेथे मेट्रोच्या पिलरभोवती छोटेखानी वाहतूक बेट तयार करण्याचे निर्देशही आयुक्त श्री. बांगर यांनी दिले. त्यामुळे पुलाखालील भागात सौंदर्यीकरण होईल आणि वाहतुकीचे परिचलनही व्यवस्थित होईल. याही चौकात झेब्रा क्रॉसिंग, लेन मार्किंग, ग्रिड मार्किंग करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

थर्ड पार्टी ऑडिट झाल्यावरच देयके

डांबरीकरण आणि काँक्रिट रस्त्यांची जी कामे पूर्ण झाली आहेत त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण करावे. आय आय टी कडून रस्त्यांची कामे प्रमाणित झाल्यावरच कंत्राटदारांची देयके दिली जातील, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??