ताज्या घडामोडी

राजीव गांधी वैद्यकियमहाविद्यालयाच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात पूर्ण करा

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले निर्देश

ठाणे (०९) : ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहांच्या सुधारणेबाबत ठाणे महापालिकेस आदेश दिले आहेत. निवासी डॉक्टरांना सर्वोच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची तत्काळ अमलबजावणी केली जावी, असे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्याच्या नियोजनासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सोमवारी निवासी डॉक्टरांच्या रुग्णालय परिसरातील तिन्ही वसतीगृहांची पाहणी केली. निवासी डॉक्टरांचे कॅन्टीन, व्यायामशाळा, खेळाच्या सुविधा आदींचे अवलोकन केल्यावर संबंधितांची बैठक घेतली.

              आमूलाग्र बदलाची गरज   

सध्या कॅन्टीनच्या वर असलेल्या वसतीगृहाच्या मुख्य इमारतीमध्ये ७८ आणि रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील वसतीगृह क्रमांक ०८ मध्ये २८ निवासी डॉक्टर राहतात. त्यापैकी वसतीगृहाच्या मुख्य इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्याची गरज आहे. इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसह अंतर्गत भागाची दुरुस्ती, स्नानगृह, शौचालय यांची पुरेशी व्यवस्था, खोलीच्या आतील रचना यांच्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे निरीक्षण आयुक्त श्री. बांगर यांनी नोंदवले.

       या वसतीगृहाच्या इमारतीचे नूतनीकरण करताना त्यात एकूण १०० निवासी डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था केली जावी. तसेच, पुरेसा सूर्यप्रकाश, वायुविजन यासाठी आवश्यक ते बदल केले जावेत. कॉमन रूम, व्यायामशाळा यांची रचना चांगली करावी. प्रवेशद्वारे मोठी आणि कोणत्याही अडथळ्याविना असतील हे पहावे, अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

सध्याच्या कॅन्टीनच्या स्थितीबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. विशेषत: स्वच्छतेचा अभाव ही दुर्लक्षित करण्याजोगी गोष्ट नाही. त्यामुळे, नवीन रचनेत या सर्व गोष्टींचा विचार केला जावा. तसेच, कॅफेटरिया किंवा खाणावळ (मेस) यापैकी नेमका कोणता पर्याय हवा याबद्दल निवासी डॉक्टरांचे मत जाणून घ्यावे असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. कॅन्टीनच्या एकूण व्यवस्थेबाबत आयुक्त श्री. बांगर यांनी विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे मतही जाणून घेतले.

वसतीगृहाच्या समोर आणि मागील बाजूस असलेल्या जागेचा वापर निवासी डॉक्टरांना क्रीडा सुविधा देण्यासाठी करावा. त्यांच्याशी चर्चा करून खेळासाठी लागणारी व्यवस्था उभी करावी, असे आयुक्त श्री. बांगर म्हणाले. वसतीगृहालगतच्या मोकळ्या जागेत अभ्यास, मनोरंजन यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच त्या सेवा कॅन्टीनशी जोडून घ्याव्यात असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

अभ्यास, प्रशिक्षण आणि निवासी सुविधा उत्तम दर्जाच्या देण्यासाठी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाचा नावलौकिक व्हावा. म्हणजे विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयाला चांगले डॉक्टर मिळतील, अशी भूमिका आयुक्त श्री. बांगर यांनी मांडली.

वसतीगृहाच्या नूतनीकरण कामाची आखणी, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामाची प्रगती याचा दिवसवार आराखडा तयार करून त्याप्रमाणे जलद काम करण्याचे आदेश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले.

       तात्पुरती व्यवस्था लवकरच

वसतीगृहाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी सध्या तिथे राहणाऱ्या निवासी डॉक्टरांची तात्पुरती व्यवस्था एका महिन्यात तयार करून घ्यावी. ही व्यवस्था करताना, रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने निवासी डॉक्टरांचे स्थलांतर करावे, असेही आयुक्त म्हणाले. पर्यायी जागेची पाहणी तत्काळ करावी, असे आदेश आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.

        रुग्णालयातील ‘तो’ ठराविक वास दूर करावा !

छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या परिसरात आल्यावर येणारा ‘तो’ ठराविक दर्प ठरवून दूर करायला हवा. योग्य स्वच्छ्ता आणि चांगल्या दर्जाची जंतू नाशके वापरली तर रुग्णालय परिसर दर्प मुक्त करणे शक्य आहे, असे निरीक्षण आयुक्त श्री. बांगर यांनी नोंदवले. त्याचबरोबर, रुग्णालय आवार, इमारती यात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. राकेश बारोट, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, डॉ. स्वप्नाली कदम, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??