पंतप्रधानांच्या ‘सुगम्य भारत’ अभियानाची सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये पायमल्ली
* अ. भा. दिव्यांग सेनेने घातले थेट मोदी- शिंदेंना साकडे
ठाणे (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सोयी-सुविधांसाठी प्रधानमंत्री कार्यालयाने सुगम्य भारत अभियान सुरु केले आहे. मात्र, या अभियानाची सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये पायमल्ली होत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसूफ खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच प्रशासकीय अधिकार्यांकडे केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयाचे उपायुक्त मकरंद देशमुख यांनी दिव्यांग आयुक्तांना पत्र पाठवून योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
मोहम्मद युसूफ खान यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, दिव्यांग आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व पालिका आयुक्त यांना निवेदने पाठविली आहेत. खान यांनी पाठविलेल्या निवेदनानुसार, प्रधानमंत्री कार्यालयाने 3 डिसेंबर 2015 रोजी सुगम्य भारत अभियान सुरु केले असून या अभियानांर्तगत सार्वजनिक इमारती, सार्वजनिक परिवहन व्यवस्था आणि माहिती व तंत्रज्ञान आदी आस्थापना दिव्यांगांसाठी अडथळा विरहित करण्याचे ध्येय ठेवण्यात आलेले आहे. दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी संचारास सुलभ होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक इमारती व परिसरातील जागेचे व्यवस्थापन करण्यासाठी एकसूत्री मार्गदर्शक सूचना जारी करुन जवळपास सहा वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्यापही या या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सुगम्य भारत अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी संचारास सुलभ होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक इमारती व परिसरातील जागेचे व्यवस्थापन करण्यासाठी एकसूत्री मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही. किंबहुना, दिव्यांग आयुक्त कार्यालयामध्येही दिव्यांगस्नेही प्रसाधनगृह अस्तित्वात नाही. तसेच, मंत्रालय, विविध पोलीस आयुक्तालये, विविध पोलीस ठाणे , ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर-नगरपालिका, रेल्वे फलाट आणि जिने, रेल्वेगाडी आदी शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांना चालण्यासाठी रेलिंग, रॅम्प, शौचालये आदींची व्यवस्थाच करण्यात आलेली नाही. शिवाय, सर्वच कार्यालयांमध्ये टाईल्स लावणयत आलेल्या आहेत. या टाईल्सवर चालणे अत्यंत जिकिरीचे असल्याने दिव्यांगांना अपघात होऊन ते जखमी होण्याची शक्यता अधिक आहे. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर संबधित अॅपवरुन ही तक्रार भलतीकडेच पाठविण्यात येत असल्याने त्या तक्रारीचे परिमार्जन होत नाही. शिवाय, सुगम्य भारत अभियानाबाबतच्या तक्रारी दाखल करण्याकरिता नागरिकांसाठी सुगम्य भारत मोबाईल अॅप कार्यान्वित करण्यात आले असून सदर अॅपवर येणार्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी उभारलेली यंत्रणा सक्षम नसल्यामुळे तक्रारींवर उपाययोजना करण्यात येत नाहीत. उलटपक्षी,केलेली तक्रार अन्य खात्याकडे जात असल्याने कार्यवाही न होताच तक्रारीचे परिमार्जन झाल्याचे कळविण्यात येत आहे. त्यामुळे या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी यंत्रणा राबवावी, अशी मागणी खान यांनी केली आहे.


