मुंबई-गोवा रस्ता बनणार ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे
मालवणी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्र्यांची माहिती

कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने सीताराम राणे यांनी ठाण्यातील शिवाई नगर येथील उन्नती मैदानात आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सीताराम राणे, सौ.स्नेहलता सीताराम राणे, हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई आदी उपस्थित होते. राणे दांपत्याने भव्य भित्त्तीचित्राची प्रतिमा सदिच्छा भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. एकनाथ शिदे यांच्या रूपाने मालवणी महोत्सवात प्रथमच मुख्यमंत्र्यांची उणीव पूर्ण झाली.अशी भावना सीताराम राणे यांनी व्यक्त केली.
तर, व्यासीठावरून संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी, अशा प्रकारचे मालवणी महोत्सव म्हणजे, रसिक, खवय्यांसाठी मेजवानी आणि पर्वणी असते. जसा फणस जरी वरून काटेरी असला तरी,आतुन गोड असतो. तशीच आमची ही कोकणातील माणसे आहेत.अशी भलामण करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाचे कौतुक केले. पुढे बोलताना, कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटीबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बिकट बनलेला मुंबई – गोवा महामार्ग लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तसेच, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ग्रीनफिल्ड अॅक्सेस कंट्रोल असा महामार्ग बनवणार असल्याचा निर्णय आपण तसेच देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, कोकणात पर्यटनाला वाव असल्याने त्यासाठी चांगले इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम कनेक्टीव्हीटी निर्माण व्हावी, यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातुन सिंधुदुर्गातील कोस्टल रस्त्यांचेही रुंदीकरण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, सर्व बीच कनेक्ट होऊन पर्यटन वाढीला मदत होईल.असेही स्पष्ट केले.
चौकट – महोत्सवात दौंडच्या आजीच्या कौतुकावरून माजी मुख्यमंत्र्याना टोला
मालवणी महोत्सवाच्या सांगता सोहळ्यासाठी थेट पुणे जिल्हयातील दौड येथुन एसटीने मोफत प्रवास करून ठाण्यात आलेल्या अनुसया नामुगडे या ७५ वर्षीय आजीबाईचे कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुमासदार टोलेबाजी केली. सीताराम राणे यांनी या आजीबाईंची व्यासपीठावर येऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी बोलताना आजींनी, या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मोफत प्रवासाची सवलत दिल्यामुळेच मी ठाण्यात आल्याचे सांगीतले. त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, सरकारने केलेल्या या योजनेचे महत्व पटवून देत आतापर्यंत तीन कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे सांगितले.तसेच, माणसाने घरातून बाहेर पडले पाहिजे तरच, तब्बेत्त ठणठणीत राहते.असे सांगुन एकप्रकारे माजी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता टोला लगावला.
चौकट – महोत्सवात आबालवृद्धांमध्ये मुख्यमंत्र्याची क्रेझ…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा प्रसारमाध्यमातून दिसतात. मुख्यमंत्री झाल्यानंतर अल्पावधीतच शिंदे चर्चेत आल्याने आबालवृद्ध तसेच महिला व प्रामुख्याने बच्चे कंपनीमध्ये शिंदेची क्रेझ निर्माण झाली आहे. याची प्रचिती रविवारी रात्री मालवणी महोत्सवात आली. महोत्सवात फेरफटका मारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी झुंबड उडाली होती. अनेकांनी त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपली तर सेल्फी काढण्यासाठीही नागरिकांमध्ये अहहमिका लागल्याचे दिसुन आले.




