आपला जिल्हा

ठाण्यातील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खूशखबर

यंदा मंडप उभारणीचे भाडे मंडळांकडून ठाणे महापालिका आकारणार नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या विंनतीला ठाणे मनपा प्रशासनाचा प्रतिसाद

ठाणे – महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. तर नवरात्रोत्सवाला धार्मिक महत्व आहे. गणेशोत्सवाच्या माध्यामातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे जनजागृतीचे मोठे कार्य करत असतात. राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी द्यावी तसेच त्यासाठी कोणतेही मंडप भाडे आकारले जाऊ नये, अशी विनंती ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या विनंतीला मान देत ठामपा प्रशासनाने दोन्ही सणांना मंडळांकडून भाडे न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

  दरवर्षी असंख्य गणेश मंडळे आणि नवरात्रोत्सव मंडळे आपापल्या परिसरात उत्साहात, भक्तिभावाने आणि प्रेमाने हा सोहळा साजरा करतात. ही मंडळे फक्त उत्सवापुरती मर्यादित नसतात, तर वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम, समाजसेवा, रक्तदान शिबिरे, पर्यावरण जनजागृती आणि नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित करत असतात. या मंडळांचा सहभाग महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्येही मोलाचा असतो. ही मंडळे ज्या मर्यादित निधीतून इतका मोठा उत्सव साजरा करतात, त्यामागे प्रचंड मेहनत, वेळ आणि नागरिकांच्या वर्गणीच्या रूपात मिळालेला थोडासा निधी असतो. पण त्या निधीतूनच मंडप भाडे, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, सुरक्षा आणि इतर खर्च भागवणं अनेकदा कठीण जातं. म्हणूनच ज्या मंडळांनी वर्षभर समाजासाठी योगदान दिले, त्यांना महापालिकेनेही आर्थिक दिलासा द्यावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना गणेशोत्सव व नवरात्रोत्सव २०२५ साठी ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक मंडळांना मंडप भाडे पूर्णपणे माफ करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते.

खासदार नरेश म्हस्के यांच्या पत्राचा गांभीर्याने विचार करून, आयुक्तांच्या परवानगीने ठाणे महापालिकेने आता गणेशोत्सव व नवरात्रोत्सव २०२५ साठी ठाण्यातील सर्व सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी आणि त्यासाठी कोणतेही मंडप भाडे आकारले जाणार नसल्याचा असा निर्णय घेतला आहे. तसे लेखी आदेशही दिले आहेत.

या निर्णयामुळे मंडळांना अधिक उत्साहाने सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम राबवता येणार आहेत. पैशाचा ताण कमी झाल्यामुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत चांगले उपक्रम पोहोचवू शकतील. हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल ठाणे महापालिकेचे व आयुक्तांचे खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??