उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाबाबतआशा वर्कर्सनी महिलांमध्ये जनजागृती करावी : आयुक्त सौरभ राव

ठाणे (25) : महिलांचे आरोग्यमान सुधारावे किंबहुना आजाराचे योग्य वेळी निदान व्हावे यासाठी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात सुरू आहे. धकाधकीच्या जीवनात महिलांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. आरोग्य ही गुंतवणूक असून वेळच्या वेळी महिलांनी तपासणी करावी यासाठी विविध भागात जाणाऱ्या आशा वर्कर्सने महिलांमध्ये जनजागृती करुन त्यांना या अभियानात सहभागी करावे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.
ठाणे महापालिकेच्या कासारवडवली येथील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रात उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपायुक्त उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे, रोटरी क्लबचे अशोक महाजन, डॉ. अनघा कारखानीस यांच्यासह आरोग्य केंद्रातील परिचारिका, आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. बदलत्या जीवनशैलीचे परिणाम हे आपल्या आरोग्यावर होत असतात, त्यामुळे वेळच्या वेळी महिलांनी तपासणी करावी अशा पध्दतीची जनजागृती झोपडपट्टी विभागात करणे आवश्यक असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले. त्यामुळे आशा वर्कर्सच्या माध्यमातून तसेच महापालिकेच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या महिलांसोबत संवाद साधून त्यांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या सूचना ही त्यांनी वेळी दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 19 जुलै रोजी या अभियानाचा शुभारंभ कोरस आरोग्य केंद्र येथे केला होता. यावेळी 50 महिलांची तपासणी करण्याचे प्रयोजन होते, परंतु पहिल्याच दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने दोन तासात 269 महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. यापुढे टप्प्याटप्प्याने ठाणे महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात हे अभियान राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. गर्भाशय मुखाचा कर्करोग, ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह तसेच हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद आदींचा अंतर्भाव या अभियानात असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी नमूद केले. यावेळी आयुक्त सौरभ राव रोझा गार्डनिया या आरोग्य केंद्रातील डायलेसीस सेंटर, अतिदक्षता कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष आदी पाहणी केली. आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे हे अभियान राबविले जात असल्याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले.




