आपला जिल्हा
गटई कामगार स्वतःच्या अंगावर रापी ओढणार
*मा. नगरसेवकामुळे चर्मकारांची उपासमार होत असल्याचा आरोप

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगर पालिका आणि राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्याने प्रमाणित केलेले गटई स्टॉल हटवण्यासाठी ठामपा अधिकार्यांवर भाजपचे मा. नगरसेवक संजय वाघुले हे दबाव टाकत आहेत. त्यामुळे गटई स्टॉल्सवर कारवाई होत असल्याचा आरोप करीत हुतात्मा दिनी म्हणजे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच आत्मक्लेश आंदोलन करीत स्वतःच्या अंगावर रापी मारून घेण्यात येणार असल्याचा इशारा गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ठाणे महानगर पालिकेने महासभेमध्ये ठराव करून चर्मकारांना गटई स्टॉल्सचे परवाने दिले आहेत. तसेच, समाज कल्याण खात्यानेही शहरातील 238 स्टॉल्सला प्रमाणित केले आहे. हे सर्व स्टॉल्स वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, या पद्धतीने उभे केले आहेत. तसेच, ठाणे स्टेशन परिसरात गोरगरीब फेरीवाले रस्त्याच्या कडेला उभे राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न मा. नगरसेवक संजय वाघुले हे करीत आहेत. त्यासाठी ते खोट्या तक्रारी करीत आहेत. तसेच, काही दुकानदारांना खोट्या तक्रारी करण्यास प्रवृत्त करीत आहेत. विशेष म्हणजे दिव्यांग,फेरीवाले, चर्मकारांचे स्टॉल्स जप्त करण्यासाठी ठामपा अधिकार्यांवर दबाव आणत आहेत. या संदर्भात गटई चर्मकार समाज कामगार संघटनेने अनेकवेळा तक्रारीही केल्या आहेत. मात्र, पोलीस आणि ठामपा प्रशासन कारवाई करीत नाही. संजय वाघुले यांच्या या खोट्या तक्रारींमुळे गोरगरीब चर्मकारांसह दिव्यांग, फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उपाशी मरण्यापेक्षा स्वतःच्या अंगावर रापीचे वार करून आत्महत्या करून मरू, असे राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता सुमारे 1000 चर्मकार ठाणे स्टेशन येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गांधी मैदानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर संजय वाघुले यांच्या कार्यालयासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करीत स्वतःस रापी मारून घेतील, असेही राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस राजकुमार मालवी, संतोष अहिरे, सुभाष अहिरे, कैलास लोंगरे, कलिराम मंडराई आदी उपस्थित होते.




