आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार
- बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 27 :- आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.
सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा 30 वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक दीपक पांडे, इंटरनॅशनल जस्टिस मशीनचे संचालक येसुदास नायडू, फेसबुक पॉलिसी लीड विभागाच्या प्रियांका जैन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी, राज्य महिला आयोगाच्या सदस्या अँड गौरी छाब्रिया, उत्कर्षा रुपवते, दीपिका चव्हाण हे उपस्थित होते.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले,राज्य महिला आयोग गेल्या तीन दशकांपासून अत्यंत चांगले काम करत आहे. काही चांगल्या बाबी शासनस्तरावर प्रगतीपथावर आहेत.राज्यातील माता भगिनींना आनंद होईल असे महिला सन्मान धोरण प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे धोरण येत्या आर्थिक वर्षात अंमलबजावणी करताना दिसतील. महिला आयोगाने केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करणार आहे. ओमानमध्ये अडकलेल्या महिलांसाठी केंद्र शासनासोबत चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढू. आरोग्य विभागाच्या पुढाकारातून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात पाच कोटींहून अधिक महिलांची तपासणी झाली आहे.
कृषिमंत्री म्हणून देखील काम केले तेव्हा महिला शेतकऱ्यांना कृषीच्या योजना प्राधान्याने राबवल्यामुळे अनेक ठिकाणी महिलांचे नाव सातबाराला लावले गेले. हा अत्यंत सकारात्मक परिणाम होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महिलांचे नाव सातबाराला लागले गेले. महिलांना शिक्षणामध्ये संधी आणि जगण्यामध्ये समान संधी देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत हे मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले.



