ताज्या घडामोडी
निसर्गाच्या सहवासात साहित्य बहरते – अरुण म्हात्रे
कोमसाप ठाणे शाखेचे 'वर्षा साहित्य संमेलन' संपन्न

बदलापूर :
सध्या मोबाईल, इंटरनेटने सगळ्याच क्षेत्रात धुमाकूळ घातला असून वाचन, लिखाण आदी साहित्य कुठेतरी हरवते आहे की काय, असे वाटू लागले आहे. अशा वेळी निसर्गाच्या सहवासात येऊन साहित्यसाधना केल्यास साहित्य अधिक बहरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी केले. बदलापूर येथील विष्णूबाग रिसॉर्ट येथे ठाणे शहर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय वर्षा साहित्य संमेलनात ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते. यावेळी कोमसाप ठाणे शहर अध्यक्ष ऍड. मनोज वैद्य व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या मनोगतात श्री. म्हात्रे पुढे म्हणाले, निसर्गाच्या सहवासात माणसाच्या वृत्ती फुलून येतात. रोजच्या धावपळीतील चिंता, व्यथा पळून जातात. लेखक, कवी यांना तर निसर्गाची किती ओढ असते. बालकवी, कवी बा. भ. बोरकर, ना.धो. महानोर अशा कवींना निसर्गाच्या सहवासातच आपल्या कविता सुचल्या.
ऍड. मनोज वैद्य यांनी प्रास्ताविकात शहरातील बंदिस्त हॉलमधून बाहेर पडून निसर्गाच्या सहवासात अशा संमेलनांची गरज असल्याचे सांगितले. निसर्ग हाच मानवाचा खरा मित्र आहे. त्याने माणसाला भव्यता, उदात्ता, रौद्रता आणि शीतलता या गुणांची ओळख करून दिली. आज घाईगर्दीत गुरफटलेल्या माणसाला या निसर्गाकडे पाहायलाही फुरसत मिळत नाही. पण निसर्गरूपी कलावंताच्या सहवासात माणूस आपले सगळे तामतणाव विसरतो. त्यामुळेच अशी निसर्ग संमेलने होण्याची आवश्यकता असून आता कोमसापच्या ठाणे शाखेच्या वतीने हिवाळ्यात ‘पोपटी साहित्य संमेलन’ आयोजित करणार असल्याचे अॅड. वैद्य यांनी सांगितले.
यावेळी तीस सहभागींनी आपल्या कविता, लेख सादर करून संमेलनात उत्साह भरला. ऍड . मनोज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रतीक्षा बोर्डे आणि पंकज पाडाळे यांनी कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले तर सूत्रसंचालनाची बाजू डॉ. प्रतिक्षा बोर्डे आणि साधना ठाकूर यांनी सांभाळली.


