जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वैद्यकीय शिबीरात २५० जणांची तपासणी
ठाणे, दि. 26 (जिमाका) – प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित वैद्यकीय तपासणी शिबिरात जिल्हा न्यायालयातील २५० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तसेच ठाण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय ज. मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली किमान समान कार्यक्रमाअंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता फाऊंडेशन व विठ्ठल सायण्णा जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात नेत्र तज्ञ व त्वचा विकार तज्ञांकडून मोफत तपासणी तसेच रक्त तपासणी करण्यात आली. तसेच विनामुल्य औषधोपचार देण्यात आले.
त्वचारोग तज्ञ डॉ. कमलाकर जावडे यांच्या हस्ते वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन करून वैद्यकीय तपासणीची सुरूवात करण्यात आली. जिल्हा न्यायालयालातील न्यायाधीश व कर्मचारी वृंद असे साधारण २०० ते २५० जणांची यावेळी तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय शिबीर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. श्री. ईश्वर का. सुर्यवंशी, डॉ. कमलाकर जावडे, डॉ. चिन्मय माने, डॉ. स्वरा शिंदे, चित्रा पाटील, प्रिया सुर्वे, देविदास दाभाडे, किर्ती बोऱ्हाडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले.



